राज्यात उन्हाचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. हवामान विभागाच्या अहवालानुसार, २ मार्च रोजी ब्रह्मपुरी, विदर्भ येथे 38.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलं, जे सध्या राज्यातील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम ठरलाय. येत्या काही दिवसांत उष्ण वाऱ्यांमुळे उन्हाचा चटका आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
राज्यातील तापमानवाढीचं मुख्य कारण काय?
हवामान तज्ज्ञ सांगतात की आग्नेय उत्तर प्रदेशात तयार झालेले चक्राकार वारे आणि त्याचा मध्य महाराष्ट्रावर होणारा परिणाम यामुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातूनच राज्यभर तापमानवाढीचा तडाखा जाणवत आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस ओलांडलंय, ज्यामुळे दुपारच्या वेळी जळजळीत ऊन्हाचा तडाखा बसतोय.
फवारणी पंप योजनेत कोण भाग्यवान? लॉटरीतून निवडलेल्या शेतकऱ्यांची यादी
उन्हाचा प्रभाव अधिक जाणवणारे भाग:
सध्या पुणे, जळगाव, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, परभणी, अकोला, चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ या भागांमध्ये उन्हाची लाट जास्त तीव्रतेने जाणवत आहे. विशेष म्हणजे जळगावमध्ये राज्यातील सर्वात कमी किमान तापमान — 17 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.
हवामान विभागाचा अलर्ट:
कोकणासाठी यलो अलर्ट: 3 ते 5 मार्च दरम्यान कोकणात उष्ण आणि दमट वातावरण राहणार आहे, त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यायला हवी.
विदर्भ आणि मराठवाड्यात कोरडे हवामान: या भागात उष्णतेचा कहर जाणवण्याची शक्यता आहे.
पुढील काही दिवस कसे असणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मार्च महिन्यात तापमान आणखी वाढेल. उन्हाळ्याची सुरुवातच तीव्र उष्णतेच्या झळांनी होणार असल्याने नागरिकांनी पाणी भरपूर प्यावे, हलके आणि आरामदायक कपडे घालावेत, घराबाहेर उन्हात जाणं टाळावं — अशी सूचना देण्यात आली आहे.
उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी खास टिप्स:
भरपूर पाणी आणि ताक प्या
गॉगल, टोपी आणि सूती कपडे वापरा
दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर जाणं शक्यतो टाळा
थंड पदार्थ आणि फळांचा रस आहारात समाविष्ट करा