रविवार, २३ मार्च २०२५ रोजी संगमनेरच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात एक ऐतिहासिक महिला क्रिकेट सामना रंगला. कॅनबेरा, ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूंनी स्थानिक खेळाडूंसोबत सराव केला आणि त्यानंतर ‘ऑस्ट्रेलिया ११’ विरुद्ध ‘संगमनेर ११’ या संघांमध्ये अत्यंत रोमांचक सामना झाला.
दोन्ही संघांनी प्रत्येकी ७३ धावा केल्याने सामना बरोबरीत गेला आणि सुपर ओव्हरची घोषणा झाली. या सुपर ओव्हरमध्ये ‘ऑस्ट्रेलिया ११’ संघाने ११ धावा करत ‘संगमनेर ११’ला ७ धावांवर रोखत ४ धावांनी विजय मिळवला. मैदानावर प्रचंड उत्साह आणि प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळाला. हा सामना संगमनेरच्या क्रिकेट इतिहासातील एक सुवर्ण क्षण ठरला.
हा सामना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेरने आयोजित केला होता. ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभव मिळावा, हा मुख्य उद्देश होता.
SBI कडून 20 वर्षांसाठी 80 लाखांचे Home Loan घेतले तर EMI किती भरावा लागणार ?
प्रत्येक संघात ५ ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि ६ स्थानिक खेळाडू असा ११ जणांचा समावेश होता. यासाठी १४ सदस्यांचे ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळ संगमनेरात दाखल झाले होते, ज्यामध्ये टीम मॅनेजर, प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट आणि खेळाडूंचा समावेश होता.
या सामन्याला आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू पूनम खेमनर यांनीही हजेरी लावली. त्यांनी आपल्या कौशल्याने स्थानिक खेळाडूंना प्रेरणा दिली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या तंत्रशुद्ध खेळीमुळे हा सामना अविस्मरणीय ठरला.
सामन्याआधी एक अनोखा क्षण घडला ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी संगमनेरच्या युवा महिला क्रिकेटपटू अंजली आणि गायत्री माघाडे या बहिणींच्या घरी भेट दिली. दोघी बहिणींनी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांना ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या भेटीने सुखद आश्चर्याचा धक्का बसला. या भेटीदरम्यान महिला क्रिकेटच्या भविष्यासाठी सकारात्मक चर्चा झाली आणि स्थानिक खेळाडूंना मोठा आत्मविश्वास मिळाला.
सामन्यात ‘संगमनेर ११’ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत ८ षटकांत ७३ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑस्ट्रेलिया ११’नेही बरोबरी साधत ७३ धावा केल्या. त्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली आणि ‘ऑस्ट्रेलिया ११’ने ४ धावांनी बाजी मारली.
विजेत्या संघाचा सन्मान माजी मंत्री बाळासाहेब थोरात, कांचन थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. मैथिली तांबे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
हा सामना म्हणजे केवळ क्रिकेटचा विजय नव्हे, तर संगमनेरच्या महिला क्रिकेटसाठी नव्या पर्वाची सुरुवात ठरली. आता संगमनेरच्या महिला क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव मिळाल्यामुळे त्यांची क्रिकेट कारकीर्द आणखी बहरणार, हे नक्की!