Virat Kohli Fan Video आयपीएल 2025 च्या दिमाखदार सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स (KKR) वर थरारक विजय मिळवत हंगामाची विजयी सलामी दिली. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराट कोहलीने आपल्या बॅटने अक्षरशः जादू केली. अवघ्या 31 चेंडूत तडाखेबंद अर्धशतक झळकावत त्याने संघाचा विजय पक्का केला. मात्र, या सामन्यात एक अनोखी घटना घडली, जी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतेय.
चाहत्याचा भावनिक क्षण थेट मैदानात धावत विराटच्या पायाशी लोटांगण!
सामन्यात विराटने 59 धावांची चमकदार खेळी साकारली. त्याच्या अर्धशतकाचा जल्लोष सुरू असतानाच अचानक प्रेक्षकांमधून एक चाहता थेट मैदानात घुसला. प्रेक्षकांच्या गडगडाटी जयघोषात हा चाहता पिचकडे धावत गेला आणि विराटच्या समोर थेट लोटांगण घातलं. या अनपेक्षित घटनेमुळे काही काळ सामना थांबवावा लागला.
विराटनेही आपल्या खास दिलदार शैलीत त्या चाहत्याला उचललं आणि त्याला मिठी मारली. सुरक्षा रक्षक आणि पंचांनी चाहत्याला मैदानाबाहेर नेलं, पण जाताना तो विराटला भेटल्याचा आनंद उघडपणे साजरा करत होता. या भावनिक क्षणाने संपूर्ण स्टेडियम भारावून गेलं.
पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायदेशीर! 60 महिन्यात मिळणार 2 लाखांचे व्याज
RCB चा विजयी तडाखा इतिहासात नोंदल्या जाणाऱ्या धावांचा पाठलाग!
KKR ने दिलेलं 175 धावांचं आव्हान RCB ने केवळ 16.2 षटकांत पार करत आयपीएल इतिहासात पुन्हा एकदा आपलं नाव कोरलं. विराट कोहली आणि फिल सॉल्ट या नव्या सलामी जोडीने पॉवरप्लेमध्येच आक्रमक सुरुवात करत 95 धावांची भक्कम भागीदारी रचली. सॉल्टने 56 धावा केल्या, तर विराटने आपल्या शैलीदार खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकत अर्धशतक झळकावलं.
हा विजय RCB च्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान विजय ठरला. 2024 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या 16 षटकांत 201 धावा करून मिळवलेल्या विजयाच्या नंतर हा सामना RCB साठी अजून एक अविस्मरणीय क्षण ठरला.
विराट फॅन्ससाठी हा सामना आठवणीत राहणारा!
विराट कोहलीच्या बॅटिंगची जादू आणि त्याच्यावर जीव ओवाळणाऱ्या चाहत्याची भावनिक भेट या सामन्याने क्रिकेटप्रेमींच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, चाहते विराटच्या दिलदारपणाचं कौतुक करत आहेत.